शिंदेंना गृह खाते हवेच भाजपाचा मात्र नकार

शिंदेंना गृह खाते हवेच भाजपाचा मात्र नकार

शिंदेंना गृह खाते हवेच भाजपाचा मात्र नकार  

शिंदे रुसून गावी गेले

मुंबई – विधानसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिले असूनही महायुतीत मुख्यमंत्रिपद आणि खात्यांवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहेत. मात्र त्यांना बदल्यात गृह खाते हवे आहे आणि हे खाते सोडण्यास भाजपा तयार नाही. त्यामुळे काल रात्री दिल्लीहून परतताच नाराज झालेले एकनाथ शिंदे आज सर्व बैठका रद्द करून सरळ दोन दिवसांसाठी आपल्या गावी निघून गेले आहेत. आता दिल्लीहून फोन आल्यावरच बोलू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

खातेवाटपावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने (शिंदे) गृह खात्यावर दावा केला आहे. हे खाते शिवसेनेला देण्यास भाजपा उत्सुक नाही. महत्त्वाची सगळी खाती भाजपाला आपल्याकडे ठेवायची आहेत. शिंदे गटाला गृह खात्याबरोबर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ही खाती आणि विधान परिषदेचे सभापती पद हवे आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदाबरोबर अर्थ, महिला बालविकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती हवी आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपदही दिले जाण्याची शक्यता आहे.

काल रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची दीड तास दीर्घ बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होऊ शकले नाही. त्यानंतर आज मुंबईत महायुतीची पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. दिल्लीहून पहाटे 3 वाजता परतलेले शिंदे यांचा चेहरा नाराजीचा दिसत होता. दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव अंतिम झाले, पण शिंदे यांची गृह खात्याची मागणी मान्य न झाल्याने शिंदे नाराज झाल्याचे सांगण्यात येत असून, आज ते आपल्या सातार्‍यातील दरे गावी गेले आहेत. शिंदे नाराज असले की, आपल्या गावी जातात, असे यापूर्वीही सहा ते सात वेळा घडले आहे.

यावेळी तब्येत बरी नसल्याने ते विश्रांतीला दरे गावी गेल्याचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज सांगितले. ते तिथे दोन दिवस थांबणार आहेत. शिंदे नाराज असल्याने दरेला गेल्याचा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, शिंदे नाराज नाहीत. त्यांना सर्दी-तापाचा त्रास होत आहे. त्यामुळे आराम करण्यासाठी ते तिथे गेले आहेत. ते नाराज असल्याने गावी गेलेत, अशा बातम्या देणे चुकीचे आहे. मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारा आहे, असे शिंदे यांनी आधीच सांगितले आहे.

दरम्यान, नव्या सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 1 डिसेंबरला दर्श अमावास्या संपते. त्यानंतर मार्गशीर्ष महिना लागतो. त्यामुळे 5 डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो. शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू झाली असून, आज मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई पोलिसांनीही शपथविधी कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे.

शपथविधीसाठी शिवाजी पार्क आणि वानखेडे स्टेडियमची चाचपणी करण्यात आली. परंतु शिवाजी पार्कवर आणि चैत्यभूमी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे, तर वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच सुरू असल्याने शपथविधीसाठी आझाद मैदानाचा पर्याय म्हणून विचार करण्यात येत आहे. भाजपाच्या विजयी आमदारांची गटनेता निवडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईत बैठक होईल, असेही सांगितले जात आहे.


चेहर्‍यावर नाराजी का? फोटोवरून चर्चा

काल दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतील महायुतीच्या नेत्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. या फोटोमध्ये अजित पवार, प्रफुल्‍ल पटेल, जे. पी. नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहर्‍यावर हास्य असल्याचे दिसत आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा काहीसा नाराज दिसत आहे. हा फोटो दिवसभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. बैठकीनंतर याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, नाराज वगैरे काहीही नाही, मी खूश आहे. कधी माझा चेहरा हसरा, कधी गंभीर काय.. काय आहे हे? आता तुम्हीच ठरवा


Most Popular News of this Week

शहापूर तालुक्यात भाजपाची...

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...