मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने तयार केल्या जात आहे - रविंद्र चव्हाण
मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने तयार केल्या जात आहे - रविंद्र चव्हाण
मतदार याद्या चुकीच्या पद्धतीने तयार केल्या जात आहे - रविंद्र चव्हाण
डोंबिवली (एजाज अब्दुल गनी):- अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधील कथित गोंधळाचा वाद चांगलाच चिघळला आहे. हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून त्याला आता राजकीय रंगही चढत आहे.सुरुवातीला ठाकरे बंधूंनी निवडणुकीतील अनियमिततेवर थेट निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितले होते. तर, आता सत्ताधारी भाजप पक्षानेही या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदार याद्यांमधील सावळ्या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदार याद्या हेतुपुरस्सर चुकीच्या पद्धतीने तयार केल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. चव्हाण यांच्या मते, अनेक मतदारांची नावे एकापेक्षा जास्त वेळा नोंदवली गेली आहेत, काहींची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत आणि काही विशिष्ट लोकांच्या दबावाखाली यादीत नोंदी केल्या जात आहेत.
उल्हासनगरमधील मतदारांची नावे अंबरनाथच्या यादीत समाविष्ट केली जात आहेत, असे चव्हाण म्हणाले. निवडणूक याद्या अधिकाऱ्यांच्या मदतीने निष्काळजीपणाने तयार केल्या जात आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने मतदार याद्या तयार कराव्यात. तसेच, त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली.
विशेष म्हणजे, यावेळी केवळ विरोधी पक्षच नव्हे, तर सत्ताधारी पक्षही निवडणूक तयारीच्या पद्धतीवर नाखूष दिसत आहे. दोन्ही बाजूंनी एकाच मुद्द्यावर आक्षेप घेतल्यामुळे अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
