कल्याण पश्चिमेत 75 सामाजिक उपक्रम राबवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
कल्याण पश्चिमेत 75 सामाजिक उपक्रम राबवणार
कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 75 सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवडा उपक्रम सुरू असून त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये बोलताना पवार यांनी हा निर्धार व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार, प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, माजी नगरसेवक संदीप गायकर, कल्याण जिल्हा वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.पंकज उपाध्याय यांच्या पुढाकाराने हे महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले.
कल्याणच्या वेदांत हॉस्पिटल, कल्याण एम.डी मेडिसिन डॉ.पराग मिसार, ऑर्थोपॅटिक डॉ.प्रफुल्ल वडदकर, डॉ.वैशाली दहिवडकर आणि त्यांच्या टीमच्या विशेष सहकार्याने बेतुरकर पाडा येथील शिशु विकास शाळेमध्ये आयोजित या महाआरोग्य शिबिराला 300 नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात रक्तदाब, ई सी जी, मधुमेह, हिमोग्लोबिन, युरिक ॲसिड, न्यूरोपॅथी, हाडांची तपासणी, रक्त तपासणी, सोनोग्राफी, 2 डी इको, एक्स रे या महत्त्वाच्या तपासण्यांसह सहभागी नागरिकांना मोफत चष्मे वाटपही करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हे तर एक जनसेवक म्हणून या देशाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. नरेंद्र मोदी यांचा हाच संस्कार भाजपच्या पदाधिकारी, नेते आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरवडा उपक्रम होत असून येत्या आठवड्याभरात आणखी 75 सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही संकल्प केल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिली. या कल्याण मधील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
