ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च
ठाणे जिल्हा नियोजन समिती मार्फत 5 महिन्यात फक्त 23%खर्च
ठाणे (प्रतिनिधी):- ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत सन 2024-25 मध्ये 1167.37 कोटी निधींपैकी 99.98% खर्च करण्यात आला तर सन 2025-26 मध्ये (ऑगस्ट अखेर) एकूण 1252.99 कोटी निधींपैकी 23% खर्च झाला आहे. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाईल. तसेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार आहे. या समितीच्या माध्यमातून वाहतूक कोंडीबाबत अभ्यास करून या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत दि.29 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले व वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सन 2024-25 मध्ये 1167.37 कोटी निधींपैकी 99.98% खर्च करण्यात आला तर सन 2025-26 मध्ये (ऑगस्ट अखेर) एकूण 1252.99 कोटी निधींपैकी 23% खर्च झाला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी CSR व लोकसहभागातून निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी ड्रोन व AI आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. सौर ऊर्जेद्वारे शासकीय कार्यालयांचे सौरीकरण (Roof Top Solar) करण्यात येणार आहे. ठाण्यातील 39 पर्यटन स्थळांचा विकास आराखडा व Explore Thane – Tourism App बद्दलही चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ, मराडेपाडा विकास आराखडा (रु.80 कोटी). तालुका क्रीडा संकुल, सेवा संवाद, राजभूमी पोर्टल, स्वयंरोजगारातून विकास आदी उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा झाली. चिखली धरणाची उंची वाढविणे, त्याचबरोबर उल्हास नदी मधून उल्हासनगरसाठी त्यांचा पाण्याचा मूळ स्त्रोत तयार करणे, यासाठी यांत्रिकरित्या पाणी उचलणे, यासाठी नगरोत्थान योजनेतून निधी देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. काळू डॅमबद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावण्याचा दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याबाबत आणि त्या विषयाला चालना देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जे रस्ते, पूल, शाळा, अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र असे जे काही नुकसान झाले आहे त्या ठिकाणीही आपण जिल्हा नियोजन मधून मदत करावी. तसेच घरांची पडझड, साहित्याचे नुकसान झाले आहे तिथेही आपण तात्काळ मदत केली पाहिजे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.
