दिवाळी स्नेहमिलन व कराओके म्युझिकल कार्यक्रम संपन्न
दिवाळी स्नेहमिलन व कराओके म्युझिकल कार्यक्रम संपन्न
डोंबिवली : कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने शनिवार ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनीलनगर परिसरातील बहिणाबाई उद्यानात दिवाळी सणानिमित्त आयोजित करण्यात आलेला कराओके म्युझिकल कार्यक्रम व दिवाळी स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शंभराहून अधिक महिला, पुरुष आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक महेश देशपांडे, आनंद पेंढारकर, शंकर शिरोळकर, निनाद बारे, सामंत काका आणि विद्याधर शिरसाट यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध मराठी आणि हिंदी गीते सादर करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. बहिणाबाई उद्यानात रंगलेल्या या सुरेल संगीत मैफलीमुळे दिवाळीच्या आनंदाला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते सांगता होईपर्यंत उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमस्थळी थांबून प्रत्येक गीताचा मनमुराद आनंद घेतला. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाने आपल्या घरून दिवाळीनिमित्त तयार केलेला फराळ सोबत आणला होता. सर्वांनी आणलेला फराळ एकत्र करून त्याचा सामूहिक आस्वाद घेतला. फराळासोबत चहापान करत संगीताच्या सुरेल वातावरणात दिवाळी स्नेहमिलनाचा आनंद द्विगुणित केला.
या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती सदस्य कृष्णा सोमार्डे यांनी केले, ज्येष्ठ नागरिक माननीय मंगलाताई वाळवेकर यांनी उत्तम कार्यक्रमाबाबत सर्वांचे कौतुक केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती सदस्य तथा माजी नगरसेवक प्रकाश शांताराम माने यांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या सणानिमित्त परिसरातील नागरिकांना एकत्र आणणे, आपुलकीचे आणि बंधुभावाचे नाते अधिक दृढ करणे तसेच संगीताच्या माध्यमातून आनंदाचे क्षण निर्माण करणे हा उद्देश असल्याचे प्रास्ताविकात नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी समिती सदस्य प्रदीप पवार यांनी उपस्थित नागरिक, गायक आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रदर्शन केले. त्यानंतर या आनंदमय आणि सुरेल दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाची सांगता झाली.नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, गायकांच्या सुरेल सादरीकरणामुळे आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचा आनंद घेतल्यामुळे हा कार्यक्रम एक अविस्मरणीय कौटुंबिक स्नेहमिलन ठरला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने उपस्थित सर्व नागरिक, समिती सदस्य - सदस्या, सुप्रसिद्ध गायक आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Most Popular News of this Week
दिवाळी स्नेहमिलन व कराओके...
दिवाळी स्नेहमिलन व कराओके म्युझिकल कार्यक्रम संपन्नडोंबिवली : कवयित्री...
