सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
मुंबई : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी मुंबई पब्लिक स्कूल, शांतीनगर, सातरस्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 210 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी यांचे कथन आहे, की जीवन तेव्हाच महत्वपूर्ण ठरते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते. हीच शिकवण धारण करुन निरंकारी भक्त निष्काम भावनेने निरंतर मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान देत असतात. संत निरंकारी मिशनच्या डिलाईल रोड आणि लोअर परळ ब्रांचच्या रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेत जवळपास 270 रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदविली होती.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या डिलाईल रोड विभागाचे संयोजक गोपीनाथ बामुगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी (मराठी) मासिकाचे संपादक चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. दोन्ही ब्रांचचे सेवादल युनिट आणि मुखी अनंत घानकुटकर यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
