Breaking News

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही - माजी आमदार नरेंद्र पवार

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही - माजी आमदार नरेंद्र पवार

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही - माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण : काळानुसार बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनात आनंदाची जागा मानसिक तणावाने घेतली असून त्यावर हसण्यासारखे दुसरे कोणतेही नैसर्गिक औषध नसल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. 

आज असलेल्या जागतिक हास्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि हास्य क्लबचे पदाधिकारी दिगंबर फडणीस यांच्या कल्पनेतून आणि दिलीप सूचक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके उद्यानात कल्याणातील विविध हास्यक्लबचा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार हे बोलत होते. 

दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हास्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हास्याच्या महत्त्वावर आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हास्याचे योगदान अधोरेखित केले जाते. हास्ययोगचे प्रणेते डॉ. मदन कटरिया यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा मुंबईत जागतिक हास्य दिन साजरा केला. त्यांच्या मते, हास्य हे आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी "हसणे हे सर्वोत्कृष्ट औषध आहे" हे तत्वज्ञान समाजात रुजवण्यासाठी या दिवसाची सुरुवात केल्याचे यावेळी नरेंद पवार यांनी सांगितले. 

त्याचाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हास्य क्लबच्या सदस्यांशी संवाद साधताना सांगितले की जागतिक हास्य दिन आपल्याला स्मरण करून देतो की आयुष्यात कितीही तणाव असला तरी हसायला विसरू नये. हसणे हा आपल्याकडील सगळ्यात सहज, विनामूल्य आणि प्रभावी उपाय आहे. आणि कल्याणातील सर्वच हास्यक्लब लोकांना तणावमुक्त करण्यासाठी त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद देण्यासाठी करत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

दरम्यान यावेळी महाराष्ट्रातील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून लातूर येथे फेस्कॉनतर्फे फेडरेशन ऑफ सीनियर सिटीजन तर्फे 2024 ला सन्मानित करण्यात आलेल्या माऊली ज्येष्ठ नागरिक हास्य क्लब, वसंत व्हॅली हास्य क्लब, मॉर्निंग वॉक ग्रुप, तारांगण महिला हास्य क्लब, रमाबाई आंबेडकर हास्य क्लब, लयभारी हास्य क्लब, राणी लक्ष्मीबाई आदी हास्य क्लब या कार्यक्रमात एकत्र आले होते. तर या क्लबच्या हास्ययोगामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी लयभारी हास्य क्लबचे दिलीप सुचक, दिगंबर फडणीस, माऊली ज्येष्ठ नागरिक हास्य क्लबचे प्रल्हाद जाधव, करमरकर मॅडम, वसंत व्हॅली हास्य क्लबचे साहेबराव चव्हाण, मॉर्निंग वॉक ग्रुप काळा तलाव, तारांगण महिला हास्य क्लबच्या शैला कपोते, रमाबाई आंबेडकर हास्य क्लबच्या डॉ.लीना काटकर, वैशाली अंबर्डेकर, राणी लक्ष्मीबाई हास्य क्लबच्या अलका वैद्य, उज्वला देशमुख, शालिनी देशपांडे, ईशा कुळकर्णी आदी. मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week