दुकानदार नराधमाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार - आरोपी गजाआड
दुकानदार नराधमाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार - आरोपी गजाआड
कल्याण : आंबिवली परिसरातील कुटुंबासोबत राहणारी ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका दुकानदाराने या मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण जवळील आंबिवली परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडित ११ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते. तिचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ५ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही. या मुलीच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला . दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी त्याच परिसरात आढळून आली. तिला विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी तिला विचारले असता तिने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. दरम्यान आंबिवली येथील नदीकिनारी शूटिंग सुरू होती. ही शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती . या नदीच्या परिसरातच गणेश म्हात्रे या नराधामाचे किराणामालाचे दुकान आहे . गणेश याची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली, त्याने तिला दुकानात बोलवले जबरदस्तीने दुकानात थांबण्यास सांगितले. मात्र या अल्पवयीन मुलीने विरोध करताच तिला दुकानात ओढून घेत दुकानाचे शटर बंद करून या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तत्काळ नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत.
