अ प्रभागात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी
अ प्रभागात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना त्याचा त्रास होतो, रस्त्यावरील कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरते तसेच कचऱ्यातील प्लास्टिक खाल्याने भटके जनावरांना त्याचा त्रास होतो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर माशा मच्छर उंदीर आदी रोगराई पसरणारे प्राणी व कीटक तयार होतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
या परिस्थितीचा विचार करत कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्षेत्राचे स्वच्छता अधिकारी सनी जाधव, स्वच्छता निरीक्षक भरत पाटील, अक्षय कारळे, सुदर्शन जाधव, आदींनी ज्या रस्त्यावर कचरा टाकला जातो अशी ठिकाणे शोधून घंटा गाडी व घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी डबेवाले यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, त्यानंतर परिसर नीट स्वच्छ करून त्या जागेवर 'येथे कचरा टाकू नये' अशा आशयाचे फलक लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. सदर उपक्रमाला घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांचे मार्गदर्शन व प्रभागातील स्वच्छता मुकादम तसेच स्वच्छता कामगार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
