कल्याण : कल्याण पश्चिमेत आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाला शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शिवसेना कल्याण शहर शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर हा महोत्सव संपन्न झाला. यंदाच्या महोत्सवाचे हे 3 रे वर्ष होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न पुरस्कार प्राप्त कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या तीन वर्षांपासून रवी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक. भाग म्हणून आयोजित या बाल महोत्सवामध्ये कल्याणातील शाळांनी मोठा सहभाग घेतला. मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थी या बाल महोत्सवात सहभागी झाले होते.
यावेळी चित्रकला, निबंध लेखन, रांगोळी आणि नृत्य अशा विविध स्पर्धा भरवण्यात आल्या. ज्यामध्ये देण्यात आलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या आपली कल्पनाशक्ती सादर केल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर या मुलांसोबत त्यांचे अनेक पालकांनीही या बाल महोत्सवात हिरीरीने सहभाग घेत आपल्यातील बालपणाला पुन्हा एकदा उजाळा दिला.
गुरुवारी सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी महापौर वैजयंती गुजर घोलप, उपशहरप्रमुख मोहन उगले, सुनिल वायले, महिला शहर संघटक नेत्रा उगले, माजी नगरसेवक मयूर पाटील, गणेश जाधव, विणा जाधव, युवासेनेचे अनिरुद्ध पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.